AmravatiAmravati PolicscitynewsCrime Newslatestnewss breakingnews

अमरावतीत कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट! सख्ख्या आईनेच दोन मुली आणि जावयांच्या मदतीने मुलाचे घर जेसीबीने पाडल्याचा आरोप!

आई, दोन बहिणी आणि जावयांवर संगनमताचा आरोप; मुलगा, सून अन् १० वर्षांची नात एका क्षणात बेघर, संसार मलब्याखाली!

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरात कौटुंबिक वादातून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या आईनेच आपल्या दोन मुली आणि जावयांच्या मदतीने मुलाचे संपूर्ण घर जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नवसारी परिसरातील गोकुळ लेआउटमध्ये मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारात मुलगा, सून आणि अवघ्या दहा वर्षांच्या नातीवर एका क्षणात बेघर होण्याची वेळ आली असून, घरातील फर्निचर, कपडे आणि संसारोपयोगी साहित्य ढिगाऱ्याखाली दबले आहे. आयुष्यभर कष्ट करून उभे केलेले घर डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाल्याने पीडित कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवसारी परिसरातील गोकुळ लेआउट येथे केबल ऑपरेटर म्हणून काम करणारे सूरज प्रभाकर भुते हे पत्नी राधिका आणि दहा वर्षांच्या मुलीसह चानापूर येथे गेले होते. मंगळवारी दुपारी सुमारे बारा वाजताच्या सुमारास ही संधी साधून सूरज यांची आई कमल भुते, दोन बहिणी राजश्री आणि जयश्री तसेच त्यांचे पती देवानंद केळकर आणि विजय हरणे यांनी संगनमत करून जेसीबीच्या सहाय्याने घर पाडल्याचा आरोप सूरज भुते आणि त्यांच्या पत्नीने केला आहे.

काही क्षणांत उभे घर झाले जमीनदोस्त!

या घटनेची गंभीर बाब म्हणजे, कोणताही न्यायालयीन आदेश नसताना संपूर्ण काँक्रीट स्लॅबची इमारत जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. घरातील फर्निचर, कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि इतर महत्त्वाचे साहित्य मलब्याखाली दबले. त्यामुळे भुते कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे. घर पाडले जात असतानाची काही दृश्ये मोबाईलमध्ये चित्रित झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, कौटुंबिक वादातून इतके टोकाचे पाऊल कसे उचलले गेले, असा सवाल उपस्थित होत आहे.

वडिलांच्या कष्टाने उभारलेले घर उद्ध्वस्त!

सूरज भुते यांचे काका यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर प्रभाकर भुते यांनी मोठ्या कष्टाने उभारले होते. कुटुंबासाठी हक्काचा निवारा निर्माण करण्याच्या उद्देशाने उभ्या केलेल्या या वास्तूची आता जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड करण्यात आली आहे. घराचा ढिगारा पाहून पीडित कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, या घटनेमुळे दहा वर्षांच्या चिमुकलीसह आई-वडिलांवर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गाडगेनगर पोलिसांत तक्रार; जेसीबी मालक आणि चालकावर कारवाई होणार?

या प्रकरणी सूरज भुते आणि त्यांची पत्नी राधिका यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घर पाडण्यासाठी जेसीबी उपलब्ध करून देणारा मालक आणि प्रत्यक्ष मशीन चालविणाऱ्या चालकाची भूमिका काय होती, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे. कोणाच्या आदेशावरून आणि कोणत्या अधिकाराने घर पाडण्यात आले, याचा तपास करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पीडित कुटुंबाला न्याय द्या; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

दरम्यान, शिवसेनेच्या रुक्मिणी बाळापुरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पीडित भुते कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. घर उद्ध्वस्त झाल्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबाला शासनाने तातडीने मदत करावी, तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

एकीकडे कौटुंबिक वादाचे प्रकरण असताना दुसरीकडे एका दहा वर्षांच्या चिमुकलीसह संपूर्ण कुटुंबाचा निवारा हिरावला गेल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, घर पाडण्याच्या घटनेची सखोल चौकशी होते का आणि शासनाकडून या बेघर कुटुंबाला मदतीचा हात मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button