कीर्तनकार दौलत सातपुते महाराजांचा मठातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह; मोबाईलही गायब!

भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील घटना; ४१ वर्षीय महाराजांच्या मृत्यूने भक्तांमध्ये खळबळ, पारध पोलिसांकडून तपास सुरू
जालना | प्रतिनिधी
समाजप्रबोधनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, आई-वडिलांची सेवा आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणारे कीर्तनकार ह.भ.प. दौलत सातपुते महाराज यांचा मठातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात ही घटना घडली. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून महाराजांचा मोबाईल फोनही गायब असल्याची बाब समोर आल्याने त्यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. या प्रकरणाचा पारध पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय दौलत रामनाथ सातपुते महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील रहिवासी होते. मागील आठ ते दहा वर्षांपासून ते भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात वास्तव्यास होते. कीर्तन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी परिसरात वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनमुक्ती, आई-वडिलांची सेवा आणि राष्ट्रसेवेचा विचार ते आपल्या कीर्तनातून मांडत असत. त्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराचे स्थान होते.
नेहमीप्रमाणे कीर्तन करून मठात गेले; सकाळी आढळला मृतदेह
१४ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे दहा वाजेपर्यंत त्यांनी अवघडराव सावंगी येथे कीर्तन केले. त्यानंतर नेहमीच्या दिनक्रमानुसार ते मठातील आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. मात्र, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी बराच वेळ होऊनही महाराज खोलीबाहेर आले नाहीत. त्यामुळे मंदिरात आलेल्या ग्रामस्थांना संशय आला.
ग्रामस्थांनी त्यांच्या खोलीत जाऊन पाहणी केली असता सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भगव्या रंगाच्या रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच भाविक आणि ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.
पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगाळ यांनी पोलीस पथक आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
महाराजांचा मोबाईल गायब; पोलिसांकडून शोध सुरू
या प्रकरणात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे घटनास्थळावरून महाराजांचा मोबाईल फोन गायब असल्याची बाब आहे. मोबाईल नेमका कुठे गेला? तो हरवला की कोणीतरी घेऊन गेला? मृत्यूच्या घटनेशी त्याचा काही संबंध आहे का? या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, समाजप्रबोधनातून लोकांना व्यसनमुक्ती आणि चांगल्या जीवनाचा संदेश देणाऱ्या महाराजांच्या अशा मृत्यूमुळे त्यांच्या भक्तांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. हा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, शवविच्छेदन अहवाल, मोबाईलचा शोध आणि पोलिसांच्या पुढील तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



