धुळ्यात बंद गोडाऊनच्या भिंतीआड मानवी सांगाडा आढळला; परिसरात खळबळ!

अवधाण एमआयडीसीतील धक्कादायक प्रकार; सांगाडा सुमारे ४० वर्षीय पुरुषाचा असल्याचा प्राथमिक अंदाज, उजव्या हातात लाल धागा तर डाव्या हाताच्या दोन बोटांत धातूच्या अंगठ्या
धुळे | प्रतिनिधी
धुळे शहरातील अवधाण एमआयडीसी परिसरात एका बंद कंपनीच्या गोडाऊनच्या भिंतीआड मानवी सांगाडा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात हा सांगाडा सुमारे ४० वर्षीय पुरुषाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. हा मृत्यू नैसर्गिक आहे की त्यामागे घातपाताचा प्रकार आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवधाण एमआयडीसी परिसरातील एका बंद कंपनीच्या गोडाऊनच्या भिंतीआड मानवी सांगाडा असल्याची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करून मानवी सांगाडा ताब्यात घेण्यात आला. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तो जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
हातातील धागा आणि अंगठ्यांवरून ओळख पटवण्याचे आवाहन
धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हा सांगाडा अंदाजे ४० वर्षीय पुरुषाचा असल्याचे दिसून येत आहे. मृतदेह बराच काळ पडून राहिल्याने कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी तपासादरम्यान मृत व्यक्तीच्या उजव्या हाताला लाल रंगाचा सुती धागा बांधलेला आढळला आहे. तसेच डाव्या हाताच्या दोन बोटांत एक तांब्याची आणि दुसरी पिवळ्या धातूची अंगठी असल्याचे समोर आले आहे. या खुणांच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
माहिती असल्यास मोहाडी पोलिसांशी संपर्क साधा
मृत व्यक्तीच्या वर्णनाशी जुळणारी कोणतीही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा संबंधित व्यक्तीबाबत कोणाकडे माहिती असल्यास त्यांनी तातडीने मोहाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
नैसर्गिक मृत्यू की घातपात? तपास सुरू
बंद गोडाऊनच्या भिंतीआड मानवी सांगाडा आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला? सांगाडा तेथे कसा आला? यामागे काही घातपात आहे का? अशा विविध शक्यतांचा विचार करून पोलीस तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी आणि पुढील पोलीस तपासातूनच या रहस्यमय घटनेमागील सत्य स्पष्ट होणार आहे.



