citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात ७८ हजारांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त; दोन विधिसंघर्षित बालकांवर कारवाई

अजनीतील जोशीवाडी-कुकडे लेआउट परिसरात गुन्हे शाखेचा छापा; विक्रीच्या उद्देशाने साठवलेले विविध कंपन्यांचे ३९ चकरी मांजे जप्त

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ४ ने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दोन विधिसंघर्षित बालकांकडून तब्बल ७८ हजार रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या ३९ चकरी नायलॉन मांजा जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.५५ ते पहाटे १.४५ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट क्रमांक १६, जोशीवाडी, कुकडे लेआउट परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पंच आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला.

यावेळी दोन विधिसंघर्षित बालकांकडे शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या एकूण ३९ चकरी जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ७८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात अप. क्रमांक ६०६/२०२६ नुसार पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ व १५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रतिबंधित मांजाची विक्री, साठवणूक आणि वापर करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे प्रतिबंधित मांजाचा साठा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button