citynewsJalnaMaharashtra

जालना जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट; नोव्हेंबरमध्येच टँकरची संख्या ११७ वर!

७९ गावे आणि ४१ वाड्यांतील २ लाख ५१ हजार नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर; अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकर सुरू, आगामी उन्हाळ्याची चिंता वाढली

जालना | प्रतिनिधी

मराठवाड्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जालना जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वीच जिल्ह्यातील पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले असून, पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेल्या टँकरची संख्या थेट ११७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ७९ गावे आणि ४१ वाड्यांमधील तब्बल २ लाख ५१ हजार ५५५ नागरिकांची तहान आता टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ११४ खासगी आणि केवळ ३ शासकीय टँकरचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांची पाणीपातळी खालावली आहे. अनेक गावांमध्ये नियमित पाणीपुरवठा करणे कठीण झाले असून, प्रशासनाला टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यातील वाढती टँकरची संख्या ही आगामी काळातील पाणीटंचाईची गंभीर पूर्वसूचना मानली जात आहे.

अंबड तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकर

तालुकानिहाय परिस्थितीचा विचार केला असता अंबड तालुक्यात पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर असल्याचे चित्र आहे. या तालुक्यात तब्बल ४१ टँकर सुरू असून, ३२ गावांमधील ८७ हजार ३४० नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

बदनापूर तालुक्यात ३७ टँकरच्या माध्यमातून २१ गावे आणि २५ वाड्यांमधील ८३ हजार ९९५ नागरिकांची तहान भागवली जात आहे. घनसावंगी तालुक्यात ३० टँकर सुरू असून, २० गावे आणि १५ वाड्यांमधील ६१ हजार ८८४ नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तर जालना तालुक्यात ९ टँकरच्या माध्यमातून ६ गावे आणि एका वाडीतील १८ हजार ३३६ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

दरम्यान, भोकरदन, जाफराबाद, परतूर आणि मंठा या चार तालुक्यांमध्ये अद्याप टँकर सुरू करण्याची वेळ आलेली नाही. मात्र, पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने या तालुक्यांमधील जलस्रोतांच्या स्थितीवरही प्रशासनाला लक्ष ठेवावे लागत आहे.

१२२ विहिरींचे अधिग्रहण

पाणीटंचाईवर तातडीने मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात एकूण १२२ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये टँकर भरण्यासाठी ११२ विहिरींचा, तर अन्य पाणीपुरवठ्यासाठी १० विहिरींचा समावेश आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांना नियमित पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी टँकर आणि विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव जलदगतीने मंजूर करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

मात्र, केवळ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणे हा कायमस्वरूपी उपाय नसल्याने प्रशासनाने पर्यायी उपाययोजनांवरही भर देण्याचे निर्देश दिले आहेत. टँकर सुरू करण्यापूर्वी जुन्या नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणे, अस्तित्वातील जलस्रोत बळकट करणे आणि आवश्यक ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आगामी उन्हाळ्याचे मोठे आव्हान

नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यातील टँकरची संख्या शंभरीपार गेल्याने आगामी उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. सध्या अडीच लाखांहून अधिक नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन, उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन, जुन्या योजनांची दुरुस्ती आणि पाण्याचा काटकसरीने वापर या बाबींवर प्रशासनाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत असताना, दुसरीकडे उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईने डोके वर काढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात प्रशासनाला कितपत यश येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button