आयफोनच्या EMI वरून मित्रानेच केली मित्राची हत्या!

पनवेलमध्ये चाकूने वार करून तरुणाचा खून; १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रतीक अंबवलेच्या हत्येचा उलगडा, आरोपीला अटक
पनवेल | प्रतिनिधी
आयफोनचे ईएमआयचे हप्ते भरण्यावरून झालेल्या वादातून एका मित्रानेच आपल्या मित्राची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. मृत तरुणाचे नाव प्रतीक अंबवले असे असून, तो ७ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या हत्येचा उलगडा केला असून, प्रतीकचा मित्र प्रतीक जाधव याला अटक केली आहे.
७ नोव्हेंबरपासून होता बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक अंबवले हा ७ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी प्रयत्न केले. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने कोपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
आयफोनच्या हप्त्यांवरून वाद
पोलिसांच्या तपासात आयफोनच्या ईएमआयचे हप्ते भरण्यावरून प्रतीक अंबवले आणि त्याचा मित्र प्रतीक जाधव यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली. याच वादातून आरोपी प्रतीक जाधव याने चाकूने वार करून मित्राची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपीला अटक; पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आरोपी प्रतीक जाधव याला अटक केली आहे. मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येमागील नेमकी परिस्थिती आणि घटनेशी संबंधित इतर तपशीलांचा पोलीस पुढील तपास करीत आहेत.



