नवीन १८ उद्यानांच्या विकासाचा गाजावाजा; आधी बडनेऱ्यातील जुन्या उद्यानांना जीवदान द्या!

ओपन जिमची साहित्ये मोडकळीस, बालकांची खेळणी तुटली; कचरा आणि वाढलेल्या झाडाझुडपांमुळे उद्यानांची दुरवस्था, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वावराने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बडनेरा (मच्छिंद्र भटकर) : अमरावती महानगरपालिका क्षेत्रात ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत १८ नवीन उद्यानांची निर्मिती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या उपक्रमाला बडनेरा झोन सभापती तथा नगरसेवक किशोर जाधव यांनीही दुजोरा दिला आहे. नवीन उद्यानांच्या निर्मितीचे स्वागत होत असले, तरी दुसरीकडे बडनेरा परिसरातील आधीपासून अस्तित्वात असलेल्या उद्यानांची दुरवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. त्यामुळे नवीन उद्यानांच्या विकासाच्या घोषणा करण्यापूर्वी जुन्या उद्यानांची अवस्था सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बडनेरा परिसरातील नववस्ती भागातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ असलेल्या उद्यानाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. येथे नागरिकांच्या व्यायामासाठी बसविण्यात आलेल्या ओपन जिममधील साहित्य मोडकळीस आले असून, लहान मुलांसाठी उभारण्यात आलेली खेळणीही तुटलेल्या अवस्थेत आहेत. परिणामी, नागरिकांना व्यायामासाठी आणि मुलांना खेळण्यासाठी असलेल्या सुविधांचा योग्य वापर करता येत नाही.

याशिवाय म्हाडा कॉलनी परिसरातील उद्यानांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. उद्यानातील झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून, परिसरात अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. या वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने उद्यानात येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी व्यायामासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे गंभीर बनला आहे.

नवीन उद्यानांच्या घोषणांपूर्वी जुन्या उद्यानांची दुरवस्था दूर करणार कोण?
महानगरपालिकेकडून नवीन उद्यानांच्या निर्मितीसाठी निधी आणि निविदा प्रक्रियेचे नियोजन केले जात असताना, विद्यमान उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीकडे मात्र पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. ओपन जिममधील व्यायाम साहित्याची दुरुस्ती, बालकांच्या खेळण्यांची पुनर्बांधणी, नियमित स्वच्छता, वाढलेल्या झाडाझुडपांची छाटणी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
नवीन उद्याने उभारण्याला नागरिकांचा विरोध नाही; मात्र आधीच उभारलेल्या उद्यानांची देखभाल होत नसेल, तर नव्या उद्यानांवर खर्च करून नेमके काय साध्य होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. उद्यानांची निर्मिती करण्याबरोबरच त्यांचे संवर्धन आणि नियमित देखभाल करण्याची जबाबदारीही महानगरपालिका प्रशासनाची आहे.
उद्यानांचा विकास की केवळ निविदांचा उत्सव?
नवीन उद्यानांच्या विकासासाठी निविदा प्रक्रिया राबविणे ही सकारात्मक बाब असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने केवळ नवीन विकासकामांच्या घोषणांवर भर न देता बडनेरा परिसरातील विद्यमान उद्यानांचे सर्वेक्षण करावे. प्रत्येक उद्यानातील समस्या निश्चित करून दुरुस्ती आणि देखभालीचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशी मागणी होत आहे.
नवनिर्वाचित नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील उद्यानांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कामांसाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः लहान मुलांच्या खेळण्यांची दुरुस्ती, ओपन जिमचे नूतनीकरण आणि स्वच्छतेसाठी नियमित यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे.
सिटी न्यूजचा सवाल : नवीन उद्यानांना हिरवळ देण्यापूर्वी जुन्या उद्यानांना जीवदान मिळणार का?
बडनेऱ्यातील उद्यानांची दुरवस्था ही केवळ सौंदर्यीकरणाची समस्या नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित बाब आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन या समस्येची कितपत दखल घेते आणि प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे कधी सुरू करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नवीन उद्याने उभारणे हे विकासाचे प्रतीक असू शकते; मात्र जुन्या उद्यानांचे जतन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामातून विकास दिसला पाहिजे, अशी अपेक्षा आता बडनेऱ्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
सिटी न्यूज | मच्छिंद्र भटकर, बडनेरा



