citynewslatestnewss breakingnewsMaharashtraNagpur

कोट्यवधींच्या मोखाबर्डी सिंचन योजनेच्या कालव्याला भगदाड; शेतात जाणारे पाणी नाल्यात!

सिंचन विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याची मोठी नासाडी; शिवानी वडेट्टीवार यांची घटनास्थळी पाहणी, विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चाने सुरू केली दुरुस्ती

नागपूर : शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याची दुरवस्था समोर आली आहे. कालव्याला मोठे भगदाड पडल्याने सिंचनासाठी शेतापर्यंत पोहोचणारे पाणी थेट नाल्यातून वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे कालव्यातून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने सिंचन विभागाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच शिवानी वडेट्टीवार यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन कालव्याची पाहणी केली. यावेळी कालव्याला पडलेले मोठे भगदाड, खराब झालेली रचना आणि त्यातून वाहून जाणारे पाणी याची त्यांनी पाहणी केली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि सिंचनासाठी पाणी मिळवताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कालव्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार सिंचन विभागाकडे तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून वेळेत दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कालव्याची गळती सुरूच राहिली आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याची नासाडी होत राहिली. अखेर शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चाने जेसीबी मशीन उपलब्ध करून देत कालव्याला पडलेले भगदाड बुजविण्याचे आणि नुकसानग्रस्त भागाची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे.

शिवानी वडेट्टीवार यांनी घटनास्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. कालव्याची झालेली दुरवस्था पाहता सिंचन योजनांच्या नियमित देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सिंचन प्रकल्प उभारले जातात; मात्र त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभारण्यात आलेल्या सिंचन योजनांमध्ये अशा प्रकारे पाण्याची नासाडी होणे ही गंभीर बाब आहे. सिंचन विभागाच्या कथित निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, नुकसानग्रस्त कामांची गुणवत्ता तपासण्यात यावी आणि या प्रकाराला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. केवळ तात्पुरती डागडुजी न करता भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सिंचन विभागाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचायला हवे असलेले पाणी नाल्यातून वाहून जात असेल, तर कोट्यवधींच्या सिंचन योजनांचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित होत असून, मोखाबर्डी योजनेतील कालव्याच्या दुरुस्तीबरोबरच संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button