मेडिकल चौक हत्याकांडाचा अवघ्या काही तासांत छडा; आयुष उर्फ चिंटूसह तिघांना अटक

बहिणीशी लग्न केल्याचा राग आणि जुन्या वैयक्तिक वादातून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
नागपूर : शहरातील मेडिकल चौक परिसरात पलाश उर्फ गनी प्रकाश वासनिक याची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी आयुष उर्फ चिंटू दीपक धूपे याच्यासह अथर्व दिनेश भगत आणि सुमित शैलेश मेश्राम या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या वैयक्तिक वादातून आणि मृतकाने आरोपीच्या बहिणीशी लग्न केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
१२ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त अंमलदारांकडून मेडिकल चौकात खून झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यावेळी इमामवाडा पोलीस ठाण्याचे नाईट अधिकारी आणि डीबी पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली. एका पथकाला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची, तर दुसऱ्या पथकाला संशयित आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली. तपासादरम्यान मृतक पलाश उर्फ गनी वासनिक याच्यावर यापूर्वी जवळपास २२ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.
बहिणीशी लग्न केल्याचा राग; जुन्या वादातून हत्या?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पलाश याने काही वर्षांपूर्वी आयुष उर्फ चिंटू धूपे याच्या बहिणीशी लग्न केले होते. याच कारणावरून आयुषच्या मनात राग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मृतकाकडून वारंवार त्रास दिला जात असल्याबाबत इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
या जुन्या वादातून आयुष उर्फ चिंटू धूपे याने अथर्व भगत आणि सुमित मेश्राम यांच्या मदतीने हत्या केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
गोपनीय माहितीच्या आधारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार यांच्या पथकातील पोलीस अंमलदार रतू टिकले यांना आरोपींच्या ठिकाणाबाबत महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ मस्के तसेच पोलीस अंमलदार शालिग्राम शेंडे, रोशनवाडी आणि प्रवीण खोसे यांच्या मदतीने तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईदरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अप्पर पोलीस आयुक्त दाभाडे, पोलीस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
मेडिकल चौकातील या हत्याकांडाचा पोलिसांनी अल्पावधीत छडा लावल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. हत्येमागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपासात आणखी कोणते खुलासे होतात, याकडे लक्ष लागले आहे.



