citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNewsNagpurPolice

नात्यातील व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीचा वारंवार विनयभंग; पारडी पोलिसांकडून आरोपीला अटक!

आत्याच्या पतीने ओळखीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप; यापूर्वीही पाच ते सहा वेळा गैरवर्तन केल्याची तक्रार, पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

नागपूर : नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नात्यातीलच एका व्यक्तीने मुलीचा वारंवार विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीच्या आत्याचा पती असून तो त्यांच्या घराशेजारीच वास्तव्यास आहे. कुटुंबातील जवळचे संबंध असल्याने मुलगी आरोपीला लहानपणापासून ओळखत होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने यापूर्वीही संधी मिळेल तेव्हा तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत पाच ते सहा वेळा अशा प्रकारचे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, काल मुलगी घराबाहेर कचरा टाकण्यासाठी गेली असताना आरोपीने तिला खोलीत नेऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर रडत आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीकडून संपूर्ण माहिती मिळताच आईने तत्काळ पारडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला. त्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी सविता चौधरी करीत आहेत. नातेसंबंधातील विश्वासाचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा हा प्रकार समोर आल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button