दिवाळीनंतरचा पहिला बाजार ‘भोंगळू हाटी बाजार’; ढोल-ताशांच्या गजरात मेळघाट दणाणला!

पारंपरिक वेशभूषेत आदिवासी तरुणाईचा उत्स्फूर्त जल्लोष; धारणीच्या बाजारपेठेत नृत्य आणि ढोल-ताशांच्या तालावर रंगला सांस्कृतिक सोहळा
धारणी : दिवाळीचा सण संपल्यानंतर मेळघाटातील आदिवासी बांधवांना विशेष उत्सुकता असते ती भोंगळू हाटी बाजाराची! आदिवासी समाजाचा उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा हा दिवाळीनंतरचा पहिला बाजार धारणी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक नृत्य आणि तरुणाईच्या जल्लोषाने संपूर्ण धारणी बाजारपेठ दुमदुमून गेली.

या उत्सवानिमित्त आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बाजारात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. गळ्यात रंगीबेरंगी हार-तुरे, डोळ्यांवर काळा चष्मा आणि पायात नवीन जोडे अशा आकर्षक पेहरावात तरुणाईने ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच या उत्सवाचा आनंद लुटला. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
लवादा येथील मंगेश भिलावेकर यांच्या टीमचे विशेष आकर्षण
यंदाच्या भोंगळू हाटी बाजारात लवादा येथील मंगेश भिलावेकर यांच्या टीमने विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या पथकाने पारंपरिक नृत्य आणि ढोल-ताशांच्या तालावर सादर केलेल्या उत्स्फूर्त नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणामुळे बाजारातील उत्साह अधिकच द्विगुणित झाला. त्यांच्या नृत्याच्या तालावर अनेक आदिवासी बांधवही सहभागी झाले होते.
आदिवासी संस्कृती आणि एकजुटीचे प्रतीक
भोंगळू हाटी बाजार हा केवळ खरेदी-विक्रीचा बाजार नसून मेळघाटातील आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, सामाजिक एकोपा आणि सामूहिक आनंद यांचे दर्शन घडविणारा उत्सव आहे. दिवाळीनंतरच्या या पहिल्या बाजारातून आदिवासी बांधव नव्या उत्साहाने आणि उमेदीनं पुढील वाटचालीला सुरुवात करतात.
पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा निनाद आणि सामूहिक नृत्याच्या माध्यमातून धारणीमध्ये आदिवासी संस्कृतीचा अनोखा आविष्कार पाहायला मिळाला. भोंगळू बाजाराच्या निमित्ताने संपूर्ण धारणी जल्लोषात न्हाऊन निघाली आणि हा दिवस उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
प्रतिनिधी : राजेश मालवीय, धारणी



