citynewsMaharashtraNagpurNagpurPolice

तरुण मजुराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर कारवाईची मागणी; अमोल वासनिक यांचा आमरण उपोषणाचा इशारा!

पीयूष डोंगरे यांच्या मृत्यूला ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप; विविध सामाजिक मागण्यांसाठी ३० नोव्हेंबरपासून आंदोलन, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नागपूर : शासकीय इमारतीत रंगकाम करताना तीन मजल्यांवरून पडून मृत्यू झालेल्या २६ वर्षीय पीयूष यशवंत डोंगरे यांच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. कंत्राटदार रोशन पाटणे यांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून दिली नाहीत तसेच सुरक्षा नियमांचे पालन केले नाही, असा आरोप समाजसेवक अमोल वासनिक यांनी केला आहे. या प्रकरणातील कंत्राटदारावर कठोर कारवाई करून मृत तरुणाच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी वासनिक यांनी ३० नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

उत्तर नागपुरातील मिलिंदनगर येथील रहिवासी पीयूष डोंगरे हे शासकीय इमारतीत रंगकाम करत असताना तीन मजल्यांवरून खाली पडले होते. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा आणि बांधकाम व रंगकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामगारांना आवश्यक सुरक्षा उपकरणे न पुरविल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप अमोल वासनिक यांनी केला असून, संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणासह विविध सामाजिक आणि जनहिताच्या मागण्यांसाठी अमोल वासनिक यांनी ३० नोव्हेंबरपासून नागपुरातील दहाव्या क्रमांकाच्या पुलियाजवळील शहीद स्मारक परिसरात आमरण उपोषण करण्यासाठी परवानगी मागितली आहे. यासंदर्भात संघटनेच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये गायीला राष्ट्रीय पशू घोषित करणे, संविधान चौकाचा विधान परिसरात समावेश करू नये, नारा परिसरातील १३० एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क उभारणे, बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर अतिक्रमणाच्या नावाखाली होणारी कारवाई थांबविणे, या मागण्यांचा समावेश आहे.

पीयूष डोंगरे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी आणि निवेदनातील सर्व मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. अन्यथा ३० नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

प्रतिनिधी : नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button