Accident NewscitynewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; १२ वर्षीय बालकासह दोघांचा मृत्यू!

चोरबाहुली शिवारात अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एक तरुण गंभीर जखमी, वाहनचालक फरार

रामटेक (अजय मेहरकुळे) : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर अपघातांचे सत्र सुरूच असून, मंगळवारी रात्री देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरबाहुली शिवारात भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने १२ वर्षीय बालकासह दोघांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे रामटेक परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरव अनंतराम वाढीवे (वय १२), अजय मधुकर कृपाले (वय २९) आणि सुनील मानिकराव गजाम (वय ३२) हे तिघेही रामटेक येथील विनोबा भावे वॉर्डातील रहिवासी होते. तिघेही पवनी येथून होंडा शाईन दुचाकीने रामटेककडे परत येत होते. दरम्यान, मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजताच्या सुमारास चोरबाहुली शिवारात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी सौरव वाढीवे आणि अजय कृपाले यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी सुनील गजाम यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार

अपघात घडताच संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी मृत बालक सौरवचे वडील फागोराम वाढीवे यांच्या तक्रारीवरून देवलापार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासह अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करीत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात एका निष्पाप बालकासह दोघांना जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत.

सिटी न्यूज | अजय मेहरकुळे, रामटेक

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button