नागपुरात एमडी ड्रग्ससदृश पदार्थासह चौघांना अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

बेलतरोडी पोलिसांची भारत पेट्रोल पंपाजवळ कारवाई; एर्टिगा कारमधून १८.३४ ग्रॅम एमडीसदृश पावडर हस्तगत, मुख्य आरोपीवर यापूर्वी पाच गुन्हे दाखल
नागपूर : नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात बेलतरोडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वर्धा रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ न्यू पंजाबी ढाब्यासमोरील सर्व्हिस रोडवर संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या एर्टिगा कारची तपासणी केली असता पोलिसांना मेफेड्रॉन (एमडी) सदृश पदार्थ आढळून आला. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, एमडीसदृश पदार्थ, कार आणि दोन मोबाईल असा एकूण १६ लाख ६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त रश्मिता राव एन., परिमंडळ क्रमांक चार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वर्धा रोड परिसरात गस्तीदरम्यान संशयास्पद वाहनावर लक्ष केंद्रित केले.
भारत पेट्रोल पंपाजवळ न्यू पंजाबी ढाब्यासमोरील सर्व्हिस रोडवर पांढऱ्या रंगाची एर्टिगा कार (क्रमांक सीजी ०८ वाय ५७६०) उभी असल्याचे पोलिसांना दिसले. वाहनामध्ये चार जण बसलेले असल्याने पोलिसांनी कारची तपासणी केली. यावेळी रेकॉर्डवरील आरोपी भूषण रमेश कुरसंगे (वय ३६) याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याची अंगझडती घेतली असता पॅंटच्या खिशात पारदर्शक पन्नीमध्ये पांढऱ्या रंगाची मेफेड्रॉन अर्थात एमडीसदृश पावडर आढळून आली.
१८.३४ ग्रॅम एमडीसदृश पदार्थ जप्त
पोलिसांनी जप्त केलेल्या पदार्थाचे वजन १८ ग्रॅम ३४ मिलीग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत ९१ हजार ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय नितेश सुभाष शाहू (वय २६) याच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल, तर मोहित गजानन भाजिपाले (वय २३) याच्याकडून रेडमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. सौरभ सतीश लष्करे (वय २३) हादेखील कारमध्ये उपस्थित होता.
या कारवाईत एमडीसदृश पदार्थासह एर्टिगा कार आणि दोन मोबाईल असा एकूण १६ लाख ६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मुख्य आरोपीवर यापूर्वी पाच गुन्हे दाखल
या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी भूषण रमेश कुरसंगे याच्याविरुद्ध यापूर्वी बेलतरोडी, सोनेगाव आणि कळमना पोलीस ठाण्यांत एकूण पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मिता राव एन. यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र नाईकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष आंधळे, सचिन बडे आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.
नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या व्यवहारांविरोधात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून या पदार्थाचा स्रोत आणि संभाव्य पुरवठा साखळीबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेलतरोडी पोलीस करीत आहेत.



