अचलपूर बाजार समितीतील सार्वजनिक शौचालयांना कुलूप!

शेतकरी, हमाल आणि कामगारांची गैरसोय; महिला मजुरांची मोठी कुचंबणा, लाखो रुपये खर्चून बांधलेली शौचालये वापराविना
अचलपूर : शेतकरी आणि कष्टकरी कामगारांची सतत वर्दळ असलेल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील तीन सार्वजनिक शौचालये कुलूपबंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही शौचालये वापराविना पडून असल्याने शेतकरी, हमाल आणि कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः महिला मजुरांना नैसर्गिक विधीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधांसाठी बांधलेली शौचालये बंद ठेवायचीच होती, तर ती बांधली कशासाठी? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही परिसरातील शेतकऱ्यांची प्रमुख बाजारपेठ आहे. येथे दररोज हजारो शेतकरी धान्य विक्रीसाठी येतात, तर अनेक हमाल आणि मजूर कामाच्या शोधात बाहेरगावाहून दाखल होतात. बाजार समितीच्या आवारात सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात ही शौचालये कुलूपबंद असल्याने नागरिकांना नैसर्गिक विधीसाठी भटकंती करावी लागत आहे.
या समस्येचा सर्वाधिक फटका महिला मजुरांना बसत आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी अनेक मजूर बाजार समितीच्या आवारात मुक्कामाला असतात. त्यामध्ये महिला मजुरांचाही समावेश असतो. मात्र, सकाळी सहा वाजण्यापूर्वी अचलपूर मार्गावरील मुख्य प्रवेशद्वार उघडले जात नसल्याने महिलांना नैसर्गिक विधीसाठी बाहेर जाणेही कठीण होते. काही महिलांना यासाठी अक्षरशः प्रवेशद्वारावरून उडी मारावी लागत असल्याचे चित्र आहे. यातून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
एकीकडे केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना, दुसरीकडे शेतकरी आणि कामगारांची वर्दळ असलेल्या बाजार समितीत सार्वजनिक शौचालये बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
लघुशंकेकडे दुर्लक्ष आरोग्यासाठी धोकादायक
लघुशंका किंवा नैसर्गिक विधी वेळेवर न केल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. पोटदुखी, मूत्रमार्गाचे विकार तसेच मुतखड्यासारख्या समस्यांचा धोका संभवतो. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने सर्व शौचालये तातडीने सुरू करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंजाबराव चौधरी (परतवाडा) यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या बाजारपेठेत मूलभूत सुविधांचाच अभाव
धान्य विक्रीसाठी परिसरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज हजारो शेतकरी विविध कामांसाठी येतात. मात्र, नैसर्गिक विधीसाठी बांधलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे कुलूपबंद असणे दुर्दैवी आहे. साध्या लघुशंकेसाठीही नागरिकांना दूरवर पायपीट करावी लागत आहे, अशी नाराजी व्यावसायिक दिलीप ठाकरे यांनी व्यक्त केली.
नळ चोरीला गेल्याने शौचालये बंद; लवकरच सुरू करणार : सभापती
दरम्यान, या समस्येबाबत बाजार समितीच्या सभापती प्रतिभा ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शौचालये यापूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र, शौचालयांमधील नळ चोरीला गेल्याने ती पुन्हा बंद करावी लागली. आता शौचालयांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असून, लवकरच ही शौचालये पुन्हा सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
मात्र, शौचालयांच्या देखभालीचा प्रश्न असला तरी शेतकरी, हमाल आणि विशेषतः महिला मजुरांना मूलभूत सुविधांपासून किती काळ वंचित ठेवणार, हा प्रश्न कायम आहे. बाजार समितीच्या सभापती आणि संचालक मंडळाने याकडे तातडीने लक्ष देऊन सर्व शौचालये प्रत्यक्ष वापरासाठी खुली करावीत, अशी मागणी शेतकरी व मजूर वर्गातून होत आहे.



