AmravaticitynewsWashim

वाशीमच्या महिलांनी गुरुकुंज मोझरीत राबविले ग्रामस्वच्छता अभियान

हातात खराटा घेऊन महासमाधी ते दासटेकडी परिसर केला स्वच्छ; महिलांच्या उपक्रमाचे कौतुक

प्रतिनिधी, जयंत निखाडे, तिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे वाशीम जिल्ह्यातील महिलांनी ग्रामस्वच्छता अभियान राबविले. गुरुदेव सेवामंडळाच्या महिला प्रचारक छाया डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो महिलांनी हातात खराटा घेऊन राष्ट्रसंतांच्या महासमाधी परिसरापासून दासटेकडीपर्यंत स्वच्छता केली.

अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यांमुळे बहुतांश आजार उद्भवतात. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. लोकसहभागातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. स्वच्छतेसोबतच गावांमध्ये विविध विकासकामांनाही या चळवळीमुळे चालना मिळाली.

शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी, घर आणि परिसराची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, अन्नाची काळजी, सांडपाण्याचे नियोजन, घनकचरा व्यवस्थापन तसेच मानवी मलमूत्राची योग्य विल्हेवाट अशा विविध बाबींवर या अभियानातून भर देण्यात आला. विद्यार्थी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, सरपंच आणि महिला भगिनींसह गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत ग्रामस्वच्छतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचारांनी प्रेरित होऊन छाया डहाके आणि वाशीम जिल्ह्यातील महिला मंडळाने गुरुकुंज मोझरीत हा स्वच्छता उपक्रम राबविला. यावेळी महासमाधी ते दासटेकडी परिसरातील स्वच्छता करण्यात आली. या अभियानाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ वाडेकर, विभा वाडेकर यांच्यासह गुरुदेव सेवामंडळाचे प्रचारक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वाशीम जिल्ह्यातील महिला मंडळाने एकदिवसीय अभियानातून स्वच्छतेचा संदेश देत केलेल्या या उपक्रमाचे गुरुकुंज मोझरी परिसरात कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button