दिवाळीच्या शुभेच्छांसाठी किन्नर समुदायाची घरोघरी भेट

शेतकऱ्यांवरील दुष्काळाच्या संकटाबद्दल व्यक्त केली चिंता; सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
अमरावती : दिवाळीच्या सणानिमित्त घरोघरी आणि दुकानांमध्ये जाऊन नागरिकांना शुभेच्छा देण्याची किन्नर समुदायाची जुनी परंपरा यंदाही कायम आहे. दिवाळी सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि भरभराटीची जावो, अशी सदिच्छा व्यक्त करत किन्नर समुदायातील सदस्य नागरिकांच्या भेटी घेत आहेत.

मात्र, यंदा कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पिकांचे नुकसान आणि हातात अपेक्षित उत्पन्न न आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा थेट परिणाम शहरातील व्यापारी वर्गाच्या अर्थव्यवस्थेवरही होत असल्याने यंदाची दिवाळी अनेकांसाठी चिंतेची ठरत असल्याची भावना किन्नर समुदायातील सदस्यांनी व्यक्त केली.
आगामी काळात शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी आणि भरभराट यावी, त्यांचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना यावेळी किन्नर समुदायाच्या वतीने करण्यात आली. दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या आयुष्यात नांदो आणि सर्वांचे जीवन सुखमय होवो, अशी शुभेच्छाही त्यांनी दिली.



