
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ; तरुणांना प्रशिक्षण देऊन स्थानिकांनाच रोजगार देण्याचा प्रयत्न करणार
वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सेलू तालुक्यातील सिंदी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एएमआरच्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्कचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक, मालाची साठवणूक आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे पालकमंत्री पंकज भोयर, आमदार समीर कुणावार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, कामाचा विस्तार जसजसा वाढेल, तसतशा या भागात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार देणार
प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे परिसरातील तरुणांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन त्यांनाच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी कौशल्य विकासावर भर देण्याची भूमिका त्यांनी मांडली.
निकृष्ट रस्त्याच्या कामावर कारवाईचे निर्देश
दरम्यान, प्रकल्पाशी संबंधित रस्त्याच्या कामाबाबतही गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटदाराने रस्त्याचे काम योग्य पद्धतीने केले नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकासकामे करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा संदेशही या निमित्ताने देण्यात आला.
सिंदी येथे उभारण्यात येणारा मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक व्यवसाय, वाहतूक क्षेत्र आणि रोजगारनिर्मितीला कितपत चालना मिळते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.



