Amravati GramincitynewsDharniEducation Newslatestnewss breakingnewsMaharashtra

नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी कुसुमकोट बु. येथे विशेष मार्गदर्शन वर्ग; ६९ विद्यार्थ्यांचा सहभाग!

मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या पुढाकारातून ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची संधी; शनिवार-रविवार नियमित सराव वर्गांचे आयोजन

सिटी न्यूज | धारणी

ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या विशेष पुढाकारातून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, धारणी तालुक्यातील कुसुमकोट बु. येथे विद्यार्थ्यांसाठी नियमित मार्गदर्शन वर्ग घेतले जात आहेत.

या उपक्रमांतर्गत दहेंडा केंद्रातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा, कुसुमकोट बु. येथे गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती, धारणी) वैभव लादे आणि केंद्रप्रमुख खेमचंद पटोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेशाची संधी मिळावी, तसेच त्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या मार्गदर्शन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता चाचणी, गणितीय क्षमता, भाषा आकलन आणि तार्किक विचारशक्ती यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा नियमित सराव करून घेतला जात आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका सोडविणे, नियमित चाचण्या आणि वैयक्तिक मार्गदर्शनावर विशेष भर दिला जात आहे.

शनिवार-रविवारी ६९ विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग

या उपक्रमांतर्गत केंद्रातील जिल्हा परिषद शाळांमधील एकूण ६९ विद्यार्थ्यांना दर शनिवारी आणि रविवारी मार्गदर्शन दिले जात आहे. मागील ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेल्या या उपक्रमात शनिवारी विद्यार्थ्यांकडून सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात, तर रविवारी सराव परीक्षेतील प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण करून त्यामागील संकल्पना समजावून सांगितल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेण्यासोबतच अचूक उत्तरे शोधण्याचा सराव मिळत आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशांत रोहनकर, कु. अनिता भिलावेकर, कु. मोहना बडवाईक, कु. सोनाली ढोले यांच्यासह सर्व वर्गशिक्षक आणि केंद्रातील शिक्षकवृंद परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकवर्ग आणि शाळा व्यवस्थापन समितीचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मिळणार नवी दिशा

ग्रामीण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्पर्धेच्या युगात सक्षम बनविणे, हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिक किंवा भौगोलिक परिस्थितीमुळे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद स्तरावर हा उपक्रम राबविला जात आहे.

अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही नवोदयसारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button