चिचगड-ककोडी रस्ता बनला अपघातांचा अड्डा; चार किलोमीटरच्या मार्गासाठी नागरिकांचा जीव टांगणीला!

महिनोनमहिने रस्त्याचे काम अर्धवट; ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, बांधकाम विभागाच्या कारभारावर नागरिकांची नाराजी
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील चिचगड-ककोडी मार्गाची दुरवस्था झाली असून, अवघ्या चार किलोमीटरच्या रस्त्यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ककोडी परिसरातील नागरिकांना पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, रुग्णालय तसेच शाळा-महाविद्यालयीन कामांसाठी चिचगड येथे जावे लागते. त्यामुळे हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि रखडलेले बांधकाम यामुळे दररोजचा प्रवास त्रासदायक ठरत आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, केवळ चार किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी इतका विलंब का होत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेक महिन्यांपासून काम अर्धवट असतानाही संबंधित बांधकाम विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. विकासकामांच्या घोषणा केल्या जात असताना जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांना मात्र सुरक्षित रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.
कंत्राटदारावर कारवाई कधी? नागरिकांचा सवाल
रस्त्याचे काम रखडविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई कधी होणार? बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची? तसेच या मार्गावर आणखी अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून रस्ता तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच संबंधित बांधकाम विभाग आणि प्रशासनाने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती व बांधकाम पूर्ण करावे. अन्यथा नागरिकांच्या रोजच्या प्रवासातील अडचणी कायम राहण्याची शक्यता आहे.
सिटी न्यूजसाठी सुधीर शिवणकर, गोंदिया.



