
मूर्तींच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ; दोन दिवसांत केवळ ९० जोड्यांची विक्री, पारंपरिक व्यवसाय संकटात
भुलाबाई उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बडनेरा बाजारपेठेत भुलाबाई-भुलोजीच्या रंगीबेरंगी मातीच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र, दुष्काळाचे सावट आणि वाढत्या महागाईमुळे यंदा पारंपरिक मूर्तिकारांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किमतीत सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली असून, दुसरीकडे ग्राहकांची संख्या घटल्याने मूर्तिकार आर्थिक संकटात सापडले आहेत.
बडनेरा बाजारपेठेत दरवर्षी भुलाबाई उत्सवाच्या काळात भुलाबाई-भुलोजीच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री होते. मात्र, यंदा माती, प्लास्टर, रंग आणि वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्याने मूर्तींच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीवरही परिणाम झाला असून, ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गतवर्षी याच कालावधीत सुमारे ४०० जोड्या मूर्तींची विक्री झाली होती. यंदा मात्र उत्सवाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत केवळ ९० जोड्यांची विक्री झाल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली. उत्पादनखर्च वाढत असताना विक्रीत घट झाल्याने वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेल्या मूर्तींचे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने मूर्ती खरेदीवर परिणाम होत असल्याची व्यथा रोतळे बंधू या मूर्तिकारांनी व्यक्त केली. उत्पादनासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत; मात्र त्या तुलनेत विक्री होत नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. वर्षभर मेहनत घेऊन उत्सवासाठी मूर्ती तयार केल्यानंतरही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
भुलाबाई उत्सव हा विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. भगवान शंकर आणि पार्वती यांच्या कथांशी संबंधित लोकपरंपरा या उत्सवामागे प्रचलित आहेत. माहेरवाशीण पार्वतीचे स्वागत, मातृत्वाचा गौरव आणि कृषिसंस्कृतीशी असलेले नाते या उत्सवातून व्यक्त होते. भुलाबाईची पारंपरिक गाणी, पूजन आणि विविध विधींमुळे आजही हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो.
मात्र, बदलती आर्थिक परिस्थिती, वाढता उत्पादनखर्च आणि घटती मागणी यामुळे पारंपरिक मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कलेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या पारंपरिक कलेचे जतन करण्यासाठी नागरिकांनी स्थानिक मूर्तिकारांकडून मूर्ती खरेदी करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त होत आहे. लोकसंस्कृतीचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी मूर्तिकारांच्या मेहनतीला योग्य प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.



