citynewsWashim

कामरगावात वैद्यकीय कचऱ्याची उघड्यावर विल्हेवाट; बालवाडी परिसरात गंभीर धोका!

बातमी प्रसिद्ध होण्याची चाहूल लागताच कचरा जाळल्याचा आरोप; डॉक्टरांना नोटिसा दिल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरात वैद्यकीय कचऱ्याची उघड्यावर विल्हेवाट लावली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बालवाडीतील लहान मुले खेळत असलेल्या परिसरात तसेच रस्त्यांवर औषधांच्या काचा आणि अन्य घातक वैद्यकीय कचरा आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कामरगाव परिसरात सुमारे १० ते १२ डॉक्टर आणि अनेक मेडिकल व्यावसायिकांकडून वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचा आरोप आहे. अमरावती ते वाशिमदरम्यान वैद्यकीय कचरा संकलनासाठी नियमित वाहन येत असतानाही संबंधित डॉक्टरांकडे कचरा विल्हेवाटीचा अधिकृत परवाना नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात येत आहे. बालवाडीच्या आवारात आणि रस्त्यांवर उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध होणार असल्याची चाहूल लागताच संबंधितांनी रात्रीच्या अंधारात वैद्यकीय कचरा जाळून टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर बालवाडी परिसराची पाहणी केली असता, तेथे औषधांच्या काचा आणि अन्य घातक वैद्यकीय कचरा आढळल्याचे सांगण्यात आले. कचरा जाळून जागा स्वच्छ करण्यात आल्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची गरज आहे.

या प्रकरणासंदर्भात आरोग्य अधिकारी शंकर नांदे यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित डॉक्टरांना नोटिसा दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नोटिसांनंतर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे, ग्रामपंचायत प्रशासनही या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वैद्यकीय कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावल्यास संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी असा कचरा आढळणे चिंताजनक आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टर आणि मेडिकल व्यावसायिकांच्या कचरा व्यवस्थापनाची तपासणी करावी, कचरा जाळल्याच्या आरोपाची चौकशी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button