AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत NUTA कडून प्रा. प्रशांत दिघे मैदानात

जुनी पेन्शन, वेतनातील टप्पा वाढ आणि शिक्षकांवरील अन्यायाच्या मुद्द्यांवर आवाज उठवण्याचा दावा

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून उमेदवार मैदानात उतरत आहेत. NUTA संघटनेच्या वतीने प्रा. प्रशांत दिघे हे ५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी अमरावती येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रा. दिघे यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. जुनी पेन्शन योजना, शिक्षकांच्या वेतनातील टप्पा वाढ, तसेच शिक्षकांवर होणारा अन्याय या मुद्द्यांसाठी आपण सातत्याने काम केल्याचा दावा त्यांनी केला.

शिक्षक संघटनांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोपही प्रा. दिघे यांनी यावेळी केला. काही शिक्षक संघटना राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली गेल्यामुळे शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांना सभागृहात अपेक्षित पद्धतीने वाचा फोडली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी विधानपरिषदेत स्वतंत्र आणि ठाम आवाजाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रा. प्रशांत दिघे हे स्वतः सिनेट सदस्य असून, शिक्षकांच्या प्रश्नांवर केलेल्या कामाचा अनुभव आणि संघटनात्मक पाठबळ या आधारावर ते अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.

दरम्यान, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या २०२६ निवडणुकीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर २०२६ आहे. अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होणार असून, निवडणूक लढविली गेल्यास २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

आगामी निवडणुकीत शिक्षकांचे प्रश्न, पेन्शन, वेतनविषयक मागण्या आणि शिक्षक संघटनांची भूमिका हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button