Amravati GramincitynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

समृद्धी महामार्गावरील अपघाताची चौकशी होणार; मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत — गृहराज्यमंत्री पंकज भोयर

सिंदी मेघे येथील दुर्गादेवी मंडळाच्या भाविकांवर काळाचा घाला; आयशर ट्रक जप्त, जखमींवर तातडीने उपचार सुरू

वर्धा | प्रतिनिधी

समृद्धी महामार्गावर दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, अपघातास कारणीभूत ठरलेला आयशर ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

वर्धेच्या सिंदी मेघे ग्रामपंचायत हद्दीतील सोमनाथ लेआउट परिसरातील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून दुर्गादेवी उत्सव साजरा केला जातो. याच मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत असताना धामणगाव ते पुलगाव दरम्यान हा भीषण अपघात झाला.

गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरो वाहनामध्ये मंडळाचे चार ते पाच पदाधिकारी होते, तर इतर कार्यकर्ते रथामध्ये होते. दरम्यान, मागून आलेल्या आयशर ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

या दुर्घटनेत पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आणखी दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली. अपघातानंतर जखमींना तातडीने सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रशासन अलर्ट; जखमींवर तातडीने उपचार

अपघातानंतर प्रशासन पूर्णपणे अलर्ट असून जखमींना आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पंकज भोयर यांनी सांगितले.

दरम्यान, काही जखमींनी अपघातानंतर तातडीने मदत मिळाली नसल्याची तक्रार केल्याची माहितीही त्यांनी दिली. या तक्रारींची दखल घेऊन नेमक्या ठिकाणी काय अडचणी निर्माण झाल्या, याची चौकशी करण्यात येणार असून आवश्यक त्या उपाययोजना आणि सूचना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आयशर ट्रक जप्त; चौकशीचे आदेश

समृद्धी महामार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे. मात्र, दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणारे वाहन कमी वेगाने जात असतानाही मागून आलेल्या आयशर ट्रकने त्याला धडक दिल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले असून आयशर ट्रक जप्त करण्यात आला आहे. अपघात नेमका कसा घडला, ट्रकचा वेग किती होता, चालकाकडून काही नियमांचे उल्लंघन झाले का आणि अपघातामागील इतर कारणे कोणती, याचा तपास केला जाणार आहे.

मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना सरकारची मदत

या भीषण दुर्घटनेमुळे मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. सरकारच्या वतीने मृत तसेच जखमींच्या कुटुंबीयांना निश्चितपणे मदत केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करताना, जखमींना आवश्यक उपचार आणि मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

बाईट : पंकज भोयर, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button