रिसोडच्या ‘रील्सस्टार’ तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांची विशेष समितीकडून चौकशी

तहसील कार्यालयात विशेष चौकशी समितीची झाडाझडती; रील्स प्रकरणासह खातेनिहाय कामकाजाची होणार सखोल तपासणी
रिसोड, वाशिम | प्रतिनिधी
रिसोड तहसील कार्यालयातील सोशल मीडिया रील्सच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठित केली असून, या समितीने आज रिसोड तहसील कार्यालयात दाखल होत चौकशीला सुरुवात केली.
विशेष चौकशी समितीने तहसील कार्यालयातील विविध बाबींची पाहणी करत संबंधित कागदपत्रे आणि कामकाजाची माहिती तपासण्यास सुरुवात केली. या चौकशीमुळे तहसील कार्यालयात दिवसभर प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
रील्स प्रकरणासह खातेनिहाय चौकशी
या विशेष समितीचे अध्यक्ष बुलढाण्याचे अपर जिल्हाधिकारी सुधीर खांडे असून, समितीत अमरावतीचे सहाय्यक आयुक्त संतोष कणसे यांच्यासह संबंधित अधिकारी सहभागी आहेत.
समितीकडून केवळ सोशल मीडिया रील्सच्या प्रकरणाचीच चौकशी केली जाणार नसून, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या कामकाजाची खातेनिहाय सखोल तपासणी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चौकशीदरम्यान कार्यालयीन कामकाज, संबंधित कागदपत्रे, प्रशासकीय निर्णय आणि इतर बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकशीत नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील आठवड्यात अहवाल विभागीय आयुक्तांकडे
विशेष चौकशी समिती आपला संपूर्ण चौकशी अहवाल पुढील आठवड्यात अमरावती विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे सादर करणार आहे. त्यानंतर चौकशी अहवालाच्या आधारे पुढील प्रशासकीय निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्याशी संबंधित रील्सचा विषय यापूर्वीही चर्चेत आला होता. आता या प्रकरणासह त्यांच्या खातेनिहाय कामकाजाची चौकशी सुरू झाल्याने प्रशासनाच्या पातळीवर या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
चौकशी समितीच्या अहवालातून नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात आणि त्यानंतर प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे वाशिम जिल्ह्यासह प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बाईट
सुधीर खांडे — अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा
“तहसीलदारांच्या कामकाजाची आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.”
बाईट
संतोष कणसे — सहाय्यक आयुक्त, अमरावती
“समितीकडून संबंधित प्रकरणासह आवश्यक त्या सर्व बाबींची तपासणी करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण करून अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाईल.”



