महसूल आदेशांच्या चौकशीसाठी शेतकरी मोबाईल टॉवरवर; बेमुदत आमरण उपोषण सुरू

प्रशांत डाखोरे यांचे लक्षवेधी आंदोलन; मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा
जयंत निखाडे | तिवसा
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात महसूल विभागाशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी एका शेतकऱ्याने थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. गुरुकुंज मोझरी येथील नव्याने विकसित करण्यात आलेल्या संत नगरी परिसरात शेतकरी प्रशांत डाखोरे यांनी टॉवरवर चढून बेमुदत आमरण उपोषण सुरू केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
महसूल विभागातील जमिनीचा ताबा, कुळ कायदा आणि जमीन हस्तांतरणाशी संबंधित प्रकरणांमध्ये देण्यात आलेल्या आदेशांची चौकशी करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी प्रशांत डाखोरे यांनी केली आहे.
डाखोरे यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाशी संबंधित आदेश, पत्रव्यवहार आणि विविध कागदपत्रांची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. संबंधित कागदपत्रांची वस्तुनिष्ठ चौकशी करून या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि प्रशासनाने आपल्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
मोबाईल टॉवरवरच आमरण उपोषण
आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रशांत डाखोरे यांनी मोबाईल टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला. टॉवरवर चढल्यानंतर त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनाची माहिती मिळताच तिवसा पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नायब तहसीलदारांसह पोलिसांनी डाखोरे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना खाली उतरून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
मात्र, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या चर्चेनंतरही डाखोरे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
संत नगरी परिसरात नागरिकांची गर्दी
शेतकरी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत असल्याची माहिती परिसरात पसरताच संत नगरी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, डाखोरे यांच्याशी सातत्याने चर्चा करून आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महसूल विभागाशी संबंधित आदेश आणि कागदपत्रांची चौकशी करण्याच्या मागणीवर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूजसाठी जयंत निखाडे, तिवसा.



