गणेशपूरच्या गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला

अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे बेमुदत साखळी उपोषण; प्रशासनावर कारवाई न केल्याचा आरोप
वाशिम : तालुक्यातील गणेशपूर ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक गायरान जमिनीवरील कथित अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. गायरान जमीन अतिक्रमणमुक्त करून सार्वजनिक वापरासाठी मोकळी करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांवर कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गुरांच्या चराईसाठी राखीव असलेल्या सार्वजनिक गायरान जमिनीवर काही व्यक्तींनी कथितरित्या अतिक्रमण करून नांगरणी केली आहे. ग्रामसभेच्या ठरावाचा गैरफायदा घेत काही हितसंबंधीयांनी जमीन ताब्यात घेतल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
अतिक्रमणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच, २०११ मध्ये तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकांनी संबंधित अतिक्रमणधारकांना शेती करण्यास हरकत नसल्याचा ठराव दिल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवावे, गायरान जमीन अतिक्रमणमुक्त करावी, ग्रामस्थांवरील कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.
मागण्या मान्य होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे गणेशपूर येथील या गायरान जमीन प्रकरणात प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि पुढील कारवाई काय होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



