खसाळ्यात नवीन पोलीस चौकी सुरू

वाढती लोकसंख्या, साप्ताहिक बाजार आणि मेट्रोच्या कामामुळे वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे पाऊल
नागपूरच्या खसाळा ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, येथे नवीन पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या, साप्ताहिक बाजार तसेच मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे परिसरात नागरिक आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी ही पोलीस चौकी सुरू करण्यात आली.

नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या दुकानगाळ्यात या पोलीस चौकीची उभारणी करण्यात आली आहे. परिसरातील वाढती गर्दी आणि नागरिकांच्या सुरक्षेची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून हे काम पूर्ण करण्यात आले.

खसाळा हे पुनर्वसित गाव असून, गेल्या काही काळात परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. साप्ताहिक बाजार आणि मेट्रोच्या कामामुळे नागरिकांची तसेच वाहनांची वर्दळ वाढल्याने पोलिसांच्या अधिक प्रभावी उपस्थितीची गरज निर्माण झाली होती.

उद्घाटनप्रसंगी खसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री धनंजय इंगोले यांनी कायदा व सुव्यवस्था ही शाश्वत विकासासाठी महत्त्वाची गरज असल्याचे सांगितले. नवीन पोलीस चौकीमुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होणार असून, भविष्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीही ही चौकी महत्त्वाची ठरणार आहे.



