citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeWardha

वर्ध्यात गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई! दोन वाहने पोलिसांच्या ताब्यात; १० गोवंशांची सुटका

अल्लीपूर-सोनेगाव स्टेशन परिसरात मध्यरात्री पोलिसांचा सापळा; चार संशयित फरार, शोध सुरू

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर परिसरात कथित गोवंश तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचत दोन वाहने ताब्यात घेतली. यापैकी एका वाहनातून तब्बल १० गोवंशांची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्लीपूर परिसरातून गोवंश कत्तलीसाठी नेला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी पोलिसांचे पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले.

पोलिसांनी सोनेगाव स्टेशनजवळ सापळा रचला. यावेळी संशयास्पद दोन वाहने त्या मार्गावरून येताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांना पाहताच वाहनचालकांनी वाहने पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी दोन्ही वाहनांना घेराव घालत ताब्यात घेतले.

१० गोवंशांची सुटका

पोलिसांनी केलेल्या तपासणीत एका बोलेरो मालवाहक वाहनातून १० गोवंश आढळून आले. यामध्ये दोन गाय बछडे आणि आठ बछडे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, वाहनांमध्ये असलेले चार संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. कारवाईदरम्यान ते फरार झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि पशू क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पशुतस्करीच्या तक्रारींची पार्श्वभूमी

अल्लीपूर परिसरात पशुतस्करीबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईनंतर परिसरातील अवैध पशुतस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

फरार संशयितांचा शोध घेण्यासोबतच या प्रकरणामागील संपूर्ण साखळीचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अवैध पशुतस्करीविरोधात कठोर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button