Crime NewsMaharashtraPune

पत्नीच्या कथित प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाची चाकूने हत्या; भोरमधील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

सारोळा-वीर रस्त्यावर पाठीमागून येत चाकूने वार केल्याचा आरोप; आरोपी पतीला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी

भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळा येथून अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. पत्नी आणि मुलीला कथित प्रियकरासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने भररस्त्यात पाठीमागून येत संबंधित तरुणावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्याचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, या घटनेत अमर नंदू पवार यांचा मृत्यू झाला आहे. राजगड पोलिसांनी या प्रकरणी दीपक जगन्नाथ पाल याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सारोळा-वीर रस्त्यावर अमर नंदू पवार हे दीपक पाल यांच्या पत्नी आणि तिच्या मुलीसोबत जात होते. याच वेळी दीपक पाल हा पाठीमागून आला आणि त्याने अमर पवार यांच्या गळ्यावर तसेच मानेवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमर पवार यांचा मृत्यू झाला.

अमर पवार यांचे दीपक पाल यांच्या पत्नीसोबत कथित प्रेमसंबंध असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक पाल यांच्या पत्नीला त्रास होत असल्याने अमर पवार यांनी तिला शिंदे-सारोळा येथे एका खोलीत ठेवले होते. तसेच तिला उत्तर प्रदेशातील तिच्या मूळ गावी पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

याच कारणातून दीपक पाल संतप्त झाला होता. अमर पवार यांचा शोध घेतल्यानंतर दोघे सोबत असल्याचे दिसताच त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये थरारक घटनाक्रम कैद झाला आहे.

हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर अमर पवार यांच्या भावाच्या तक्रारीवरून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी आरोपी दीपक जगन्नाथ पाल याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेल्या या हल्ल्यामुळे भोर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील नेमकी पार्श्वभूमी आणि हत्येमागील कारणांचा अधिक तपास राजगड पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button