अमरावती स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूवर सुषमा अंधारे आक्रमक

दुर्घटनेची शक्यता माहिती असतानाही नवजात बालकांना धोकादायक ठिकाणी का ठेवले? PWD अधिकाऱ्यांवर FIR का नाही? सुषमा अंधारेंचा सवाल
अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुग्णालय प्रशासन आणि सरकारवर गंभीर आरोप करत थेट जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दुर्घटनेची शक्यता आधीच माहीत होती, तर नवजात बालकांना अशा धोकादायक ठिकाणी का ठेवण्यात आले, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल का करण्यात आला नाही, असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन तासांपासून वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दर्यापूरचे आमदार गजानन लवटे, आमदार नितीन बापू देशमुख आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी गंभीर सवाल उपस्थित केला. रुग्णालयात दुर्घटना घडू शकते, याची माहिती सिव्हिल सर्जनना होती, तर नवजात बालकांना त्या ठिकाणी ठेवताना आवश्यक खबरदारी का घेतली गेली नाही, असा सवाल त्यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल व्हायला हवा होता, मात्र तो दाखल करण्यात आला नसल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.
रुग्णालयातील कामकाजाच्या दर्जावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक ठेकेदारांकडून निकृष्ट पद्धतीने काम करण्यात आल्याचा आणि लाखो रुपयांचे काम दाखवून प्रत्यक्षात कमी खर्चात काम केले जात असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
अंधारे यांनी भंडारा येथील ९ मे २०२१ रोजीच्या घटनेचाही संदर्भ दिला. त्या घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात तीन नवजात बालकांचा जळून मृत्यू झाल्याने प्रशासनाने मागील घटनांमधून कोणताही धडा घेतला नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली. जिल्ह्यातील समस्या सोडवण्याऐवजी पालकमंत्री पक्षवाढीच्या राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. बावनकुळे यांना मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या राजकारणापलीकडे काहीच दिसत नसल्याची टीकाही अंधारे यांनी केली.
अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेत तातडीने सुधारणा केली जाणार का? आणि या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



