ChandrapurcitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

वडिलांकडून दोन मुलांवर धारदार वस्तूने हल्ला; एकाचा मृत्यू

चंद्रपूरच्या दुर्गापूरमधील शक्तिनगर कॉलनीत थरारक घटना; ११ वर्षीय मुलगा गंभीर, आरोपी पिता अटकेत

चंद्रपूर | प्रतिनिधी

चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातील शक्तिनगर कॉलनीत सोमवारी सायंकाळी काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. वडिलांनीच आपल्या दोन मुलांवर धारदार वस्तूने हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेत सात वर्षीय देवांशचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ११ वर्षीय सुशांत गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता मंगेश बदखल याला अटक केली आहे.

घरातच मुलांवर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश बदखल हा आपल्या दोन मुलांसह वेस्टर्न कोलफील्ड्सच्या चंद्रपूर क्षेत्रातील क्वार्टरमध्ये राहत होता. सोमवारी सायंकाळी शक्तिनगर कॉलनीतील घरात ही घटना घडली.

मंगेशने दोन्ही मुलांवर धारदार वस्तूने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात दोन्ही मुले गंभीर जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तसेच पोलिसांनी तातडीने हालचाल करत जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केले.

सात वर्षीय देवांशचा मृत्यू

दोन्ही मुलांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सात वर्षीय देवांशचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्याचा मोठा भाऊ ११ वर्षीय सुशांत गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुशांतची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी?

प्राथमिक माहितीनुसार, मंगेश बदखल आणि त्याच्या पत्नीमध्ये काही महिन्यांपूर्वी कौटुंबिक वाद झाला होता. त्यानंतर पत्नी घर सोडून गेल्याचे सांगितले जात आहे. मंगेश ऑटो चालवून दोन्ही मुलांचा सांभाळ करत होता.

पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि त्यातून तो तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुलांवर हल्ला करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आयुष नोपनी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्यासह दुर्गापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी आरोपी मंगेश बदखल याला अटक केली असून, घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, घटनाक्रम आणि इतर बाबी तपासातून स्पष्ट होणार आहेत.

या घटनेमुळे शक्तिनगर कॉलनीत एकच खळबळ उडाली असून, पोटच्या मुलांवर झालेल्या या हल्ल्याचे नेमके कारण काय, याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button