अमरावतीत एमडी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; ५०.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाटीपुरा परिसरातून २१४ ग्रॅम मेफेड्रोनसह आरोपी अटकेत; स्विफ्ट कार, मोबाईलही जप्त
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहर गुन्हे शाखेने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पाटीपुरा परिसरातून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला रंगेहाथ अटक केली. या कारवाईत २१४ ग्रॅम मेफेड्रोन, स्विफ्ट कार आणि मोबाईलसह एकूण ५० लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पाटीपुरा परिसरात एक व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान एमएच ४० सीए २१९१ क्रमांकाच्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या सईद खान शरीफ खान (वय ४१, रा. पाटीपुरा, अमरावती) याची झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्याकडून २१४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी ड्रग्ज) जप्त करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ४२ लाख ८० हजार रुपये आहे.
याशिवाय आरोपीकडून ८ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, १५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल तसेच दोन हजार रुपये किमतीचे दोन जिओ भारत मोबाईल जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५० लाख ९९ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नागपुरी गेट पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे तसेच गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अमरावती शहरात अमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही महत्त्वाची कारवाई मानली जात असून, शहरातील ड्रग्ज नेटवर्कवर मोठा प्रहार झाल्याचे मानले जात आहे.



