आर्वीतील मुख्य मार्ग अंधारात; बंद पथदिव्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नगर परिषद कार्यालय ते बसस्थानक मार्गावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी
आर्वी (वर्धा) | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरातील नगर परिषद कार्यालय ते बसस्थानक हा प्रमुख आणि सर्वाधिक वर्दळीचा मार्ग अनेक दिवसांपासून अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघात आणि गुन्हेगारी घटनांचा धोका वाढल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नगर परिषद कार्यालय ते बसस्थानक हा मार्ग शहरातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो. दररोज मोठ्या संख्येने नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यावसायिक या मार्गाचा वापर करतात. मात्र, पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी अंधारमय होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अंधारामुळे रस्ते अपघात होण्याची शक्यता वाढली असून चोरी, लूटमार आणि इतर गुन्हेगारी घटनांची भीतीही निर्माण झाली आहे. विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहराच्या विकासाबाबत मोठे दावे केले जात असताना मुख्य मार्गावरील प्रकाशव्यवस्थेची ही अवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. ही समस्या नवीन नसून वारंवार उद्भवत असल्याचा दावा स्थानिकांनी केला असून, अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असल्याने पथदिव्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने पथदिव्यांची दुरुस्ती करून मार्गावरील प्रकाशव्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता या समस्येवर संबंधित प्रशासन कितपत वेगाने कार्यवाही करते, याकडे संपूर्ण आर्वीकरांचे लक्ष लागले आहे.



