citynewsLatest NewsMaharashtraWashim

जमिनीच्या मोबदल्याप्रकरणी तोंडगाव टोल प्लाझा जप्तीचे आदेश

20 जुलैपर्यंत थकबाकी न भरल्यास कारवाई; वाशिम जिल्हा न्यायालयाचा आदेश

वाशिम | प्रतिनिधी

जमिनीच्या अधिग्रहणाचा योग्य मोबदला न मिळाल्याच्या प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) तोंडगाव टोल प्लाझावर जप्तीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, 20 जुलै 2026 पर्यंत शेतकऱ्यांची थकबाकी अदा न केल्यास टोल प्लाझावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेबी दिनकर गर्जे आणि विठ्ठल दिनकर गर्जे यांच्या जमिनीचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 (सध्याचा NH-53) प्रकल्पासाठी अधिग्रहण करण्यात आले होते. शेतकऱ्यांचा दावा आहे की, त्यांना केवळ प्लॉटचा मोबदला देण्यात आला; मात्र ले-आऊटमधील रस्ते, खुली जागा आणि इतर सुविधांसाठी राखीव जागेचा मोबदला देण्यात आला नाही. तसेच राज्य महामार्गालगत असलेल्या जमिनीचा मोबदला कमी दराने देण्यात आल्याचाही त्यांनी दावा केला आहे.

या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत वाढीव मोबदला अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या आदेशांची अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी वसुलीसाठी वाशिम जिल्हा न्यायालयात सहा दरखास्ती दाखल केल्या.

या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर 7 जुलै 2026 रोजी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी तोंडगाव टोल प्लाझा जप्तीच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, 20 जुलै 2026 पर्यंत संबंधित थकबाकी अदा न केल्यास टोल प्लाझावर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई केली जाईल.

शेतकऱ्यांचे वकील अॅड. उदय देशमुख यांच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या वसुलीसाठी टोल प्लाझा जप्त करण्याचा हा राज्यातील महत्त्वाच्या आणि दुर्मीळ न्यायालयीन आदेशांपैकी एक मानला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात जमिनीच्या अधिग्रहणासंदर्भातील अनेक दावे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे या प्रकरणातील न्यायालयीन आदेशाकडे शेतकरी, कायदेतज्ज्ञ आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button