citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

कसारबेहड येथे जिवंत वीजतार घरावर कोसळली; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

महागाव तालुक्यातील घटना; महावितरणच्या कथित निष्काळजीपणाबाबत ग्रामस्थांचा संताप

यवतमाळ | प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील कसारबेहड (सेवानगर) येथे महावितरणची जिवंत वीजतार एका घरावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. वीजपुरवठा सुरू असतानाच ही तार तुटून घरावर पडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकरणात महावितरणच्या कथित निष्काळजीपणाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कसारबेहड येथील दिलीप माधव राठोड यांच्या घराजवळून जाणारी महावितरणची वीजतार अचानक तुटून थेट घरावर कोसळली. विशेष म्हणजे, त्यावेळी वीजपुरवठा सुरू असल्याने तार जिवंत अवस्थेत होती. त्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

घटना घडली त्यावेळी घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. काही क्षणांच्या फरकाने गंभीर दुर्घटना घडू शकली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घराजवळून जाणारी धोकादायक वीजतार हटविण्याबाबत काही वर्षांपूर्वीच महावितरणकडे लेखी अर्ज करण्यात आला होता. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर वीजपुरवठा सुरक्षित करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक हालचाली सुरू करण्यात आल्या.

दरम्यान, परिसरातील जीर्ण वीजतारा आणि वीजखांबांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या घटनेमुळे वीज सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महावितरण प्रशासन या प्रकरणात कोणती उपाययोजना करते आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button