कुपटा घाटात कार-टिप्परची भीषण धडक; मानोऱ्यातील दोन युवा व्यावसायिकांचा मृत्यू

अमरावतीकडे जाताना दुर्दैवी अपघात; मानोरा शहरावर शोककळा
वाशीम | प्रतिनिधी
वाशीम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा मार्गावरील कुपटा घाटात शुक्रवारी सकाळी कार आणि टिप्पर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मानोरा येथील दोन युवा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मानोरा शहरात शोककळा पसरली असून व्यापारी व नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मानोरा येथील सुफियान कादर लंघा आणि इम्रान शेख हे एमएच-३२-एएस-५८५८ क्रमांकाच्या कारने कामानिमित्त अमरावतीकडे जात होते. कुपटा गावाजवळील घाट परिसरात त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या टिप्परशी समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात दोन्ही व्यावसायिकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मृत सुफियान कादर लंघा हे मानोरा येथील विदर्भ कलेक्शन या प्रतिष्ठानचे मालक होते. तर इम्रान शेख यांचे मानोरा बसस्थानक परिसरात विदर्भ जनरल स्टोअर्स अँड कोल्ड ड्रिंक्स हे व्यावसायिक प्रतिष्ठान असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही शहरातील परिचित युवा उद्योजक असल्याने त्यांच्या निधनाची बातमी समजताच मानोरा शहरात शोककळा पसरली.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे कुपटा घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांकडून या घाट परिसरात आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.



