citynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

बसमार्ग बदलल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय; धामणगाव रेल्वेत रास्ता रोको आंदोलन

बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी; विद्यार्थी, पालक आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे शहरात रस्त्याच्या कामामुळे एसटी बसमार्गात करण्यात आलेल्या तात्पुरत्या बदलांचा फटका शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. बसमार्ग बदलल्याने विद्यार्थ्यांना दररोज दोन ते तीन किलोमीटर पायी चालावे लागत असून, बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. या समस्येच्या निषेधार्थ विद्यार्थी, पालक आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराज चौकात ठिय्या व रास्ता रोको आंदोलन केले.

धामणगाव रेल्वे शहरातील सेफला हायस्कूल ते शास्त्री चौक या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) काही बसमार्गांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. त्यानुसार चांदूर रेल्वे मार्गावरील बस अंजनसिंगी मार्गे, तर इतर बस मंगरूळ फाटा मार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांसमोर प्रवासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बसच्या वेळा आणि बदललेल्या मार्गांची पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या बस चुकत आहेत. काही विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर दीर्घकाळ बसची प्रतीक्षा करावी लागत असून, अनेकदा रात्री उशिरा घरी पोहोचण्याची वेळ येत असल्याची तक्रार पालकांनी केली.

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी, पालक तसेच शहर काँग्रेस, युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.

यानंतर शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन बसमार्ग पूर्ववत सुरू करावेत आणि प्रवाशांची गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, या मागण्यांवर प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे धामणगाव रेल्वेकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button