अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; सावनेर तालुक्यातील पिपळा भदी परिसरातील घटना

वन विभाग व पोलिसांची घटनास्थळी धाव; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
सावनेर | प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा भदी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.
रस्त्यालगत बिबट्या मृतावस्थेत पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांना याची माहिती दिली.
यानंतर वन विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर विजय गंगावणे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत वन कर्मचारी पंकज कोल्हे आणि प्रवीण बांगडे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, केळवद पोलीस ठाण्याचे अधिकारी सूरज परमार यांनी पंचनामा करून तपास सुरू केला.
वन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वन विभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली.
या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वनक्षेत्रालगतच्या रस्त्यांवर वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



