citynewsLatest NewsMaharashtraMumbaiWeather Report

मुंबईतील चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 10 जखमी

मुंबईतील चेंबूर परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून किमान 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट.

मुंबईतील चेंबूरच्या रोड क्रमांक 11 येथे ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या बसमध्ये एकूण 13 विद्यार्थी प्रवास करत होते. त्याचवेळी रस्त्यालगतचे मोठे झाड अचानक बसवर कोसळले.

या भीषण दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर किमान 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

चार विद्यार्थ्यांवर झेन रुग्णालयात उपचार सुरू असून इतर काही विद्यार्थ्यांना जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, बसमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. झाडाचे मोठे फांद्या कापून विद्यार्थ्याला सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी करण्याबाबत वारंवार महानगरपालिकेला लेखी तक्रारी देण्यात आल्या होत्या. यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडल्याचा दावा स्थानिकांनी केला असून, प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने आज मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि धोकादायक झाडांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू असून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button