रहाटगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात ग्रामस्थांचा मोर्चा; १५ जुलैपूर्वी काम सुरू करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

दोन वर्षांपासून अपूर्ण रस्त्यामुळे नागरिक त्रस्त; सार्वजनिक बांधकाम विभागासमोर जोरदार आंदोलन
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील रहाटगाव मुख्य रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना चिखल, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आंदोलनानंतर प्रशासनाने १५ जुलैपूर्वी काम सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, रहाटगाव मुख्य रस्त्याचे भूमिपूजन ९ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्यांचे काम करण्यात आले असले, तरी खडीकरण आणि रस्त्याचे अंतिम काम अपूर्ण राहिल्याने पावसाचे पाणी साचत असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे पादचारी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले असून वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित कार्यवाही झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर शेकडो ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. समस्येची स्थळ पाहणी करून अहवाल तयार करण्यात येईल तसेच संबंधित कंत्राटदारासोबत तातडीची बैठक घेऊन कामाला गती दिली जाईल, असे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, ग्रामस्थांनी १५ जुलैपूर्वी रस्त्याचे काम सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यानंतरही प्रश्न मार्गी लागला नाही तर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम वेळेत सुरू होते का, याकडे आता रहाटगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



