भरधाव फॉर्च्युनरची स्कुटीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

बुद्धनेश्वर फाटा येथे भीषण अपघात; जाळीचादेव गावावर शोककळा, चालकाविरोधात कारवाईची मागणी
बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा–बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावरील बुद्धनेश्वर फाटा येथे भरधाव फॉर्च्युनर वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र जाळीचादेव येथील शेतकरी बाबुराव शामराव लुटे (वय ६४) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे जाळीचादेव गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
रविवारी रात्री सुमारे ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, बाबुराव लुटे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे स्कुटीवरून जात होते. त्याचवेळी अजिंठा मार्गावरून बुलढाण्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४३ सीएम ०००३ क्रमांकाच्या फॉर्च्युनर वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की बाबुराव लुटे हे अनेक फूट दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत बाबुराव लुटे यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच धाड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप बोस यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रविंद्र चव्हाण आणि भगवान खंमाटे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, धाड ग्रामीण रुग्णालयात डॉ. अजहर मिर्झा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. सोमवारी जाळीचादेव येथे शोकाकुल वातावरणात बाबुराव लुटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत बाबुराव लुटे यांच्या पश्चात पत्नी, सून आणि नातू असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संबंधित वाहनचालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस करत आहेत.



