citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurPolice

न्यायाधीशांच्या बंगल्यात विषारी नागाचा थरार; सर्पमित्राच्या धाडसी रेस्क्यूने टळला अनर्थ

नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल किलोर यांच्या स्नेह बंगल्यात विषारी नाग साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल तीन दिवसांपासून परिसरात वावरत असलेल्या या नागाला अखेर सर्पमित्र शुभम पराळे यांनी धाडसी कारवाई करत सुखरूप पकडले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेह बंगल्याच्या मागील भागात कर्मचाऱ्यांना साप दिसून आला होता. गेल्या तीन दिवसांपासून हा नाग परिसरात वावरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत बंगल्यातील कर्मचारी संकल्प नरवाडे यांनी तातडीने पोलिस कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

त्या वेळी शुभम पराळे हे मानकापूर परिसरात अन्य कामात व्यस्त होते. मात्र माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बंगल्याची पाहणी करत असताना इन्व्हर्टरखाली साप लपून बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

सापाचा शोध सुरू असतानाच अचानक नागाने फणा काढून बाहेर येत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत शुभम पराळे यांनी कोणतीही घाबरगुंडी न उडवता रेस्क्यू मोहीम सुरू ठेवली. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर विषारी नागाला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले.

यानंतर नागाला भरणीत बंदिस्त करून वन विभागाच्या सेमिनरी हिल्स टीटीसी ट्रान्झिट सेंटर येथे नेण्यात आले. तेथे आवश्यक पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी नागाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

या धाडसी रेस्क्यूमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, सर्पमित्र शुभम पराळे यांच्या तत्परता आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, पावसाळ्याच्या काळात सापांचे दर्शन वाढत असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्र किंवा वन विभागाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button