बडनेरा बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक मोहीम; 200 मीटर परिसर ‘नो पार्किंग झोन’ घोषित

अमरावती | प्रतिनिधी
बडनेरा बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने धडक कारवाई सुरू केली आहे. बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ लागू करण्यात आला असून एसटी बसेस वगळता खासगी प्रवासी वाहनांना प्रवेश व पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र मोहिमेच्या सुरुवातीलाच नियमांचे उल्लंघन समोर आल्याने या कारवाईच्या प्रभावीतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अमरावती दौऱ्यानंतर एसटी महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यासह राज्यातील सर्व बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ लागू करण्यात आला आहे.
बडनेरा बसस्थानक परिसरात एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस आणि दक्षता विभागाच्या संयुक्त पथकांनी विशेष तपासणी मोहीम राबवली. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या महसुलावर मोठा परिणाम होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा कलम 122 आणि 177 अंतर्गत दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
मात्र मोहिमेच्या दुसऱ्याच दिवशी बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात लक्झरी बसेस आणि खासगी प्रवासी वाहने उभी असल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे ही मोहीम केवळ औपचारिकता ठरणार की सातत्याने कठोर अंमलबजावणी केली जाणार, याबाबत नागरिक आणि प्रवाशांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी खासगी वाहनचालक आणि प्रवासी वाहतूकदारांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. बसस्थानक परिसरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी आणि अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आता या मोहिमेची खरी परीक्षा येत्या काही दिवसांत होणार असून नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई होते का, याकडे नागरिक आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.



