Amaravti GraminAmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationamravatinewsCivicAdministrationLatest NewsMaharashtraMaharashtraNews

जनगणनेला वेग; ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे अमरावती मनपाचे लक्ष्य

अमरावती | सिटी न्यूज

देशाच्या विकासाचा पाया मानल्या जाणाऱ्या जनगणना प्रक्रियेला आता वेग आला असून अमरावती महानगरपालिका प्रशासनाने सर्व झोनमधील जनगणना कार्य ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जनगणनेतील माहिती अचूक, विश्वासार्ह आणि अद्ययावत राहावी यासाठी आयुक्त वर्षा लड्डा यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.

आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेत आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या बैठकीत पर्यवेक्षक, चार्ज अधिकारी तसेच जनगणना कार्याशी संबंधित विविध अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

बैठकीत जनगणना संचालनालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देण्यात आलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी जनगणना ही देशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाची माहिती अचूक आणि अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

प्रगणकांकडून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीची काटेकोर तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पर्यवेक्षकांनी दररोज माहितीची छाननी करावी आणि चार्ज अधिकाऱ्यांनी नियमित पडताळणी करून कोणतीही अपूर्ण किंवा चुकीची माहिती प्रणालीवर अपलोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले.

महानगरपालिकेच्या सर्व झोनमधील क्षेत्रीय काम ५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन आणि समन्वय साधण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. डेटा संकलनानंतर तो वेळेवर प्रणालीमध्ये सिंक करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत आयुक्तांनी डेटा सिंकमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये यावर विशेष भर दिला.

माहिती वेळेत अद्ययावत न झाल्यास डेटामध्ये विसंगती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्व पर्यवेक्षकांनी आपल्या अधिनस्त प्रगणकांच्या कामावर नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दररोज सायंकाळी प्रगणकांची बैठक घेऊन कामाचा आढावा, अडचणींचे निराकरण, माहितीची गुणवत्ता आणि डेटा सिंकची खात्री करण्याचे आदेशही देण्यात आले.

आवश्यकतेनुसार चार्ज अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन माहितीची खातरजमा करावी, असे निर्देश देत बैठकीच्या शेवटी आयुक्त वर्षा लड्डा यांनी अचूक माहिती, नियमित डेटा सिंक, सातत्यपूर्ण पडताळणी आणि वेळेत काम पूर्ण करणे या चार मुद्द्यांवर विशेष भर दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button