citynewsLatest NewsMaharashtraWashim

शेलूबाजार चौकातील नाले गाळाने तुंबले; पावसाळ्यापूर्वीच नागरिक-व्यापाऱ्यांची तातडीच्या सफाईची मागणी

वाशिम, प्रतिनिधी : वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार चौकात पावसाळ्यापूर्वीच गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुख्य चौकातून अडाण नदीकडे जाणारे नाले गाळ, प्लास्टिक कचरा आणि घाणीने पूर्णपणे तुंबल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीने नाल्यांची सफाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

शेलूबाजार मुख्य चौकातील नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे अडथळलेला आहे. त्यामुळे थोड्याशा पावसातही चौकात पाणी साचून ते रस्त्यांवरून वाहू लागते. परिणामी परिसरातील दुकाने, बँका आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात शेलूबाजार चौक जलमय होतो. यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतुकीवर परिणाम होण्यासोबतच दैनंदिन जनजीवन विस्कळीत होते.

नाल्यांचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर गुरुदेव नगर परिसरातील घरांमध्येही पाणी शिरत असल्याची समस्या नागरिकांनी मांडली आहे. त्यामुळे घरगुती साहित्य आणि मालमत्तेचे नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे पावसाळ्यापूर्वी नाल्यांची व्यापक सफाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना राबवून प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारावी, अशीही मागणी होत आहे.

आगामी पावसाळा लक्षात घेता प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button