वाशिममध्ये मध्यरात्री तुफान राडा; वाईन बारसमोर दोन गटांमध्ये हाणामारी, व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

वाशिम, प्रतिनिधी : वाशिम शहरात मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. शहरालगतच्या काटा रोड परिसरातील एका वाईन बारसमोर दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर काही क्षणांतच तुफान हाणामारीत झाले. काठ्या, फळ्या आणि लाथाबुक्क्यांनी झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास वाईन बारसमोर दोन गटांमध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला. मात्र हा वाद अल्पावधीतच उग्र बनत दोन्ही गटांतील तरुणांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.
या घटनेदरम्यान काठ्या, फळ्या आणि लाथाबुक्क्यांचा वापर करण्यात आल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. अचानक झालेल्या या राड्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हाणामारी सुरू असताना एक पोलीस कर्मचारी वर्दीत घटनास्थळी उपस्थित असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मात्र, व्हिडिओच्या आधारे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका नेमकी काय होती, तसेच त्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोणती पावले उचलली होती का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या घटनेनंतर वाशिम पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाणार, व्हायरल व्हिडिओच्या आधारे संबंधितांवर गुन्हे दाखल होणार का आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी वाढत्या हिंसक घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात असून कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.



