जुन्या आर्थिक वादाची धक्कादायक परिणती; नागपुरात मध्यरात्री बलेनो कार पेटवली, महिला आरोपी २४ तासांत गजाआड

नागपूर, प्रतिनिधी : नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्री घडलेल्या कार जाळण्याच्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. भरवस्तीत घरासमोर उभी असलेली मारुती सुझुकी बलेनो कार अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. मात्र मानकापूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावत महिला आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.
ही घटना ३० मे रोजी पहाटे साधारण तीन वाजताच्या सुमारास गोधनी परिसरातील पागोली लेआऊट येथे घडली. निखिलेश राजूरकर यांच्या घरासमोर उभी असलेली बलेनो कार अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मध्यरात्रीच्या शांततेत लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर आले. मात्र काही क्षणांतच संपूर्ण कार ज्वाळांनी वेढली गेली आणि वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती कारजवळ येताना आणि त्यानंतर आग लावताना स्पष्टपणे दिसून आली. यानंतर तांत्रिक पुरावे, गुप्त माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांच्या डीबी पथकाने वेगाने तपास सुरू केला.
अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव पुष्पाबाई काशीराम अमले (वय ५५) असून त्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवासी आहेत.
पोलिस तपासात या घटनेमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. आरोपी महिला ही तक्रारदाराची दूरची नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांमध्ये जुन्या आर्थिक व्यवहारांवरून वाद सुरू होता. आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या रागातून आरोपी महिलेने नागपूर गाठले आणि पेट्रोलच्या सहाय्याने कार पेटवून दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या गुन्ह्याचा उलगडा करण्यात मानकापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पीएसआय फोमने, पीएसआय डगवाल, पोलीस कर्मचारी प्रशांत, बिपीन, योगेश, आशिष, रोशन तसेच महिला हवालदार अश्विनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी केली.
सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांची अधिक पडताळणी सुरू असून आरोपी महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागपूर शहरात सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



