दिल्ली-एनसीआरमध्ये आजपासून वाहतूकदार, टॅक्सी आणि ऑटो चालकांचा तीन दिवसांचा संप सुरू; प्रवाशांना मोठा फटका

दिल्ली-एनसीआरमध्ये आजपासून वाहतूकदार, ट्रक चालक, टॅक्सी आणि काही ऑटो संघटनांनी तीन दिवसांच्या संपाला सुरुवात केली आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (AIMTC) च्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनामुळे दिल्लीच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गाझीपूर, टिकरी आणि सिंघू बॉर्डरवर ट्रक आणि मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-एनसीआरमध्ये वाहन प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून हा संप 23 मेपर्यंत सुरू राहणार असल्याचे AIMTC चे माजी अध्यक्ष कुलतरण सिंह अटवाल यांनी स्पष्ट केले आहे.
या संपामागे वाढते इंधन दर, दिल्लीमध्ये प्रवेश करणाऱ्या मालवाहू वाहनांवरील Environment Compensation Cess (ECC) मध्ये वाढ, तसेच टॅक्सी आणि ऑटो चालकांच्या विविध आर्थिक मागण्या ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
‘चालक शक्ती युनियन’ने दिल्लीचे उपराज्यपाल, मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. संघटनेनुसार, दिल्ली-एनसीआरमधील टॅक्सी भाडे जवळपास 15 वर्षांपासून वाढवले गेलेले नाही. मात्र या काळात CNG, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाहनांचे विमा, फिटनेस, परवाने, देखभाल खर्च आणि इतर दैनंदिन खर्चही प्रचंड वाढले आहेत.
संघटनेने आरोप केला आहे की, ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अॅप-आधारित कंपन्या मनमानी पद्धतीने काम करत असून चालकांचे आर्थिक शोषण केले जात आहे. वाढत्या महागाईत जुन्याच भाडेदरांवर सेवा देताना चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संपाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि प्रमुख चौकांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक ऑटो स्टँड ओस पडले होते तर काही भागांत प्रवाशांना वाहनांसाठी प्रतीक्षा करावी लागली.
मात्र सर्वच ऑटो आणि टॅक्सी संघटनांनी या संपाला पाठिंबा दिलेला नाही. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी या आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशासमोर आंतरराष्ट्रीय इंधन दरवाढीचे मोठे आव्हान असताना सामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच काही ऑटो संघटनांनीही स्पष्ट केले आहे की त्यांची सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. दिल्ली प्रदेश टॅक्सी युनियन, ऑटो ड्रायव्हर्स वेलफेअर संघ दिल्ली आणि इतर काही संघटनांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोनदा वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 98 रुपये 64 पैसे तर डिझेलचा दर 91 रुपये 58 पैसे इतका झाला आहे. वाढत्या इंधन दरामुळेच चालक आणि वाहतूकदारांमध्ये संताप वाढत असल्याचे चित्र आहे.
आता सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा होऊन तोडगा निघतो का, की हा संघर्ष आणखी तीव्र होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.



