Chhatrapati Sambhaji NagarcitynewsJalnaLatest NewsMaharashtra

जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; शेतकरी अडचणीत

जालना-छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर सध्या ‘नो स्टॉक’चे फलक झळकत असल्याने वाहनधारक आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बदनापूर शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध असल्याने ट्रॅक्टरसह दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. इंधन मिळवण्यासाठी वाहनधारकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

या इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीची कामे वेगाने सुरू असताना डिझेल उपलब्ध होत नसल्याने ट्रॅक्टर आणि शेतीसाठी वापरली जाणारी यंत्रे बंद पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व तयारीवर थेट परिणाम होत असून शेतकरी चिंतेत आहेत.

दुसरीकडे कॅन आणि ड्रममध्ये डिझेल देण्यास मर्यादा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शेतातील पंप, इंजिने आणि इतर यंत्रसामग्रीसाठी इंधन नेणे कठीण होत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

महामार्गावरील अनेक पेट्रोल पंप बंद अवस्थेत दिसत असून “नो स्टॉक”चे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे एका पंपावरून दुसऱ्या पंपावर हेलपाटे मारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करावा आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र डिझेल व्यवस्था करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी आणि वाहनधारक दोघेही मोठ्या संकटात सापडले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button